खामगाव : एमएसईबीजवळील पडीत जागेत मेंढ्या व बकऱ्या चारण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात शेख सोहील शेख शब्बीर यांच्या फिर्यादीवरून स्वामी सोनाजी हाके (२७) व अमर सुधाकर हाके (२५), दोघेही रा. हिवरखेड, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या चुलत काका शेख सरदार शेख नजीर हे एमएसईबीजवळील पडीत जागेत बकऱ्या चारत असताना, तेथे मेंढ्या चारणाऱ्या दोघांशी त्यांचा वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी शेख दिलदार शेख सरदार व शेख सोहील तेथे गेले असता त्यांना काठीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत दोघे जखमी झाल्याचे नमूद असून, वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याच घटनेप्रकरणी स्वामी सोनाजी हाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख सरदार शेख नजीर व शेख दिलदार शेख सरदार यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मेंढ्या चारण्यावरून झालेल्या वादात शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर दगडाने डोक्यावर मारहाण करून काठीनेही मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोहेकॉ विठ्ठल चव्हाण करीत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.