घरासमोर उभी दुचाकी पेटवण्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, तालुक्यातील वरखेड येथील घटना

मलकापूर : तालुक्यातील वरखेड येथे घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. कुटुंबीयांच्या प्रसंगावधानामुळे आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दुचाकीचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरखेड येथील प्रकाश सुखदेव आगाशे (वय ६५) यांनी मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता त्यांची दुचाकी (क्र. एमएच-२८-एक्यू-३६८९) घरासमोरील रस्त्यावर उभी केली होती. त्यानंतर कुटुंबीय झोपले असताना रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरडाओरडा ऐकून कुटुंबीय बाहेर धावत आले. यावेळी प्रकाश आगाशे यांचा मुलगा गजानन आगाशे याने तत्काळ पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग आणखी पसरली नाही. मात्र, तोपर्यंत दुचाकीच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले होते.
या प्रकरणी प्रकाश आगाशे यांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुन्या वादातून किंवा अन्य कोणत्या कारणातून जाणीवपूर्वक घडवून आणली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!