Headlines

मलकापूर एसटी बसस्थानकासमोर अवैध वाहतुकीचा विळखा; आगारप्रमुखांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह! २०० मीटर परिसरातील नियमांची अंमलबजावणी कुठे? खासगी वाहनांकडून प्रवाशांची पळवापळवी, आगारप्रमुखांची हाताची घडी अन् तोंडावर बोट !

मलकापूर ( दिपक इटनारे ) : मलकापूर एसटी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खासगी प्रवासी वाहनांनी विळखा घातला असताना, या गंभीर प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या आगार प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच खाजगी वाहने, आणि खासगी ट्रॅव्हल्सचा वावर वाढल्याचे चित्र दिसत असून, एसटीने प्रवास करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना या गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात, तर दुसरीकडे बसस्थानकाच्या दारातच खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी नेले जात असल्याचे चित्र असेल, तर आगारप्रमुख नेमके काय करत आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. बसस्थानकाचा कारभार सांभाळणाऱ्या आगारप्रमुखांना आपल्या स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील परिस्थिती दिसत नाही का, की दिसत असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, प्रवाशांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि खासगी वाहनांमुळे एसटीच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे, ही आगार प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, मलकापूर बसस्थानकासमोरील परिस्थिती पाहता या जबाबदारीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील निर्बंधांबाबत नियम व स्थानिक आदेशांची अंमलबजावणी होत नसेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. खासगी वाहनांची गर्दी, प्रवाशांना वाहनांकडे बोलावण्याची धावपळ आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असेल, तर आगारप्रमुखांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. आगारप्रमुखांना प्रवाशांच्या अडचणी दिसत नाहीत की बसस्थानकाबाहेरील अव्यवस्थेबाबत त्यांना काहीच देणेघेणे नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच महामंडळाच्या हिताचे संरक्षण करणेही आगार प्रशासनासाठी महत्त्वाचे आहे. बसस्थानकासमोर खासगी वाहनांचा वावर वाढत असल्याने एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर परिणाम होत आहे का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची पळवापळवी होत असल्याचा आरोप होत असताना, आगारप्रमुखांनी आतापर्यंत कोणती पावले उचलली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती दिली का आणि अनधिकृत वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती कार्यवाही केली, याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. केवळ कार्यालयात बसून कारभार चालवणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून समस्येवर उपाययोजना करणेही तितकेच आवश्यक आहे. केबिनमधी आराम महत्त्वाचा की उन्हातान्हात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या समस्या? हा सवाल आगारप्रमुखांच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने उपस्थित होत आहे.
बसस्थानकासमोरील या परिस्थितीसाठी केवळ खासगी वाहनचालकांना जबाबदार धरून आगार प्रशासनाची जबाबदारी झटकता येणार नाही. संबंधित वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन विभागाकडे असले, तरी बसस्थानकाच्या व्यवस्थापनाशी संबंधित समस्या वरिष्ठ यंत्रणांच्या निदर्शनास आणून त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी आगार प्रशासनावरही आहे. त्यामुळे मलकापूर आगारप्रमुखांनी या प्रश्नावर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा खुलासा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच, एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी मलकापूर आगाराच्या कामकाजाची दखल घेऊन बसस्थानक परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आगारप्रमुखांकडून खुलासा मागवावा. कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
बसस्थानकाच्या दारात खासगी वाहतुकीचा उच्छाद सुरू असताना आगारप्रमुखांच्या कारभाराची जबाबदारी निश्चित होणार तरी कधी? प्रवाशांना सुरक्षित आणि अडथळामुक्त वातावरण मिळवून देणे, महामंडळाच्या हिताचे संरक्षण करणे आणि बसस्थानक परिसरात शिस्त राखण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणे, ही आगार प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे आता तरी मलकापूर आगारप्रमुख या समस्येवर ठोस पावले उचलणार का, की खासगी वाहनांची गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय अशीच सुरू राहणार, याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे. आता प्रश्न खासगी वाहनांचा नाही, तर आपल्या कार्यक्षेत्रातील अव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यात आगारप्रमुख किती गंभीर आहेत, हा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!