मलकापूर : जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून वकिलाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची आणि चाकूने वार करून जखमी केल्याची घटना मलकापूर शहरातील बारादरी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जखमी वकिलाला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैय्यद तावीश सैय्यद एजाज (वय २९, रा. मलकापूर, हल्ली मुक्काम नागपूर) हे २४ सप्टेंबर रोजी रात्री आपल्या आजीला भेटल्यानंतर नागपूरला जाण्याच्या तयारीत होते. याचदरम्यान जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी सैय्यद माजीद याने चाकूने तावीश यांच्या डोक्यावर तसेच डाव्या दंडावर वार केल्याने ते जखमी झाले. याशिवाय, चौघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. जखमी तावीश यांना सुरुवातीला मलकापूर येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर प्रकृतीच्या उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमींच्या जबाबावरून सैय्यद माजीद, सैय्यद सोहेल, रेहाना परवीन आणि बुशरा महेक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या मालमत्तेच्या वादातून घडलेल्या या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.