जलंब : घराकडे परतण्याचा प्रवास तीन तरुणांसाठी अखेरचा ठरला. शेगाव येथून काम आटोपून दुचाकीने आपल्या गावाकडे परत जात असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पारखेड फाट्यानजीक जिओ पेट्रोल पंपासमोर घडली. या घटनेने हरणखेडसह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील रहिवासी दिगंबर चंद्रकांत इंगळे, मयूर निवास होले तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील घाणखेड येथील परेश सुरेश घुले हे तिघे जण दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए ०३४१ ने शेगाव येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपल्यानंतर तिघेही दुचाकीने घराकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, पारखेड फाट्यानजीक जिओ पेट्रोल पंपासमोर पोहोचताच त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील तिन्ही तरुणांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती.