Headlines

टाकरखेडा मुसलमान येथे ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ; वरदडा येथील तरुणावर संशयाची सुई; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

  1. चिखली :तालुक्यातील टाकरखेडा मुसलमान येथे एका ३० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपाल संजय पवार (वय ३०, रा. टाकरखेडा मुसलमान) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे गावात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाच्या हत्येमागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणात वरदडा (ता. चिखली) येथील अजय उर्फ गोट्या पवार याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी यामावर, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा अमडापूर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त प्रभार सांभाळणारे भूषण गावंडे आणि अमडापूर पोलीस ठाण्याचे बालाजी सानप यांनी पोलीस पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती घेऊन तपासाला गती देण्यात आली. गोपाल पवार यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, त्यांच्यात आणि संशयितामध्ये पूर्वीपासून काही वाद होता का, तसेच या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, या सर्व बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. प्राथमिक संशयाच्या आधारे अजय उर्फ गोट्या पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासह पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणातील संशयिताची भूमिका, हत्येमागील कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे टाकरखेडा मुसलमानसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *