मोताळा : तालुक्यातील सांगळद शिवारातून जाणाऱ्या नळगंगा धरणाच्या पात्रात ३६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. हर्षपाल उर्फ छोटू आनंदा खराटे (वय ३६, रा. पिंप्री गवळी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सांगळद शिवारातील नळगंगा धरणाच्या पात्रात रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिक कृष्णा चव्हाण यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत पिंप्री गवळी येथील अजय खराटे यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अजय खराटे यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची पाहणी केली असता तो अजय खराटे यांचे काका हर्षपाल उर्फ छोटू खराटे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे हवालदार अमोल खराडे आणि पोलिस अंमलदार प्रमोद साळोख यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ठाणेदार सिताराम मेहेत्रे आणि पीएसआय यांनीही घटनास्थळी पाहणी केली. या घटनेप्रकरणी अजय खराटे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पुढील तपास पोहेकॉ. अमोल खराडे करीत आहेत.