मोबाईल संदेशातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग; २३ वर्षीय तरुणाविरुद्ध पॉस्कोचा गुन्हा, शेगाव येथील घटना

शेगाव : अल्पवयीन मुलीला वारंवार मोबाईल संदेश पाठवून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध पॉस्कोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दहावीचे शिक्षण सुरू असताना संबंधित तरुणाकडून होत असलेल्या त्रासाकडे सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या मुलीने त्रास वाढल्यानंतर अखेर पोलिसांत धाव घेतली.
ही घटना शेगाव शहरातील जगदंबा चौक परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी एका खासगी क्लासेसमध्ये आली होती. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने तिची भेट घेतली. मुलीच्या मोबाईलवर काही संदेश आले असल्याचे तिच्या मैत्रिणीच्या निदर्शनास आले. हे संदेश ९०२२८९१८३१ या मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात आले होते. संदेशांमध्ये मुलीची विचारपूस करण्यात आली होती.
सदर मोबाईल क्रमांक हा सुरज जानकीराम गावंडे (वय २३, रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) याचा असल्याचे मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. संबंधित तरुणाकडून यापूर्वीही मुलीला त्रास दिला जात असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. दहावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने सुरुवातीला तिने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याच्याकडून होणारा त्रास वाढत गेल्याने तसेच भविष्यात पुन्हा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी सुरज गावंडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७५, ७८ तसेच पॉस्को कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश भामोदकर करीत असून, पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!