दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

देऊळगाव मही : राजा-चिखली-देऊळगाव राजा चौपदरी महामार्गावरील रामनगर फाट्याजवळ मंगळवारी (२८ जुलै) दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील भरधाव वाहनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
माहितीनुसार, अंत्री खेडेकर येथील रोहन कैलास माळेकर (वय २१) हे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भिका शितोळे (वय ५०, रा. रामनगर) यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की रोहन माळेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भिका शितोळे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी रोहन माळेकर यांना मृत घोषित केले.
दरम्यान, मेरा खुर्द फाटा व रामनगर परिसरात गतिरोधक, इशारा फलक आणि वेगनियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!