शेतरस्त्याच्या जुन्या वादातून घरासमोर येऊन तिघांना मारहाण, जीवे मारण्याची धमकी

खामगाव : वडिलोपार्जित शेतीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून लोणी गुरव येथे घरासमोर येऊन एका व्यक्तीने कुटुंबातील तिघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी फिर्यादीच्या पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी रात्री आरोपी दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला. फिर्यादीचे पती राजेश म्हस्कर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. वाद सोडविण्यासाठी पुढे आलेल्या नर्मदाबाई म्हस्कर यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान, अनिता म्हस्कर यांनी हस्तक्षेप करताच आरोपीने काठीने मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या. तसेच संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी अनिता राजेश म्हस्कर (वय ४५, रा. लोणी गुरव) यांच्या फिर्यादीवरून गजानन दिनकर म्हस्कर (वय ३५, रा. लोणी गुरव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फिर्यादीचा पुतण्या असून, शेतीच्या रस्त्यावरील जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!