मलकापूर : घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेल्या २४ वर्षीय युवकाचा दुसऱ्याच दिवशी शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने दसरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) करून पुढील तपास सुरू केला आहे. दसरखेड येथील राहुल मधुकर नरोटे (वय २४) हा एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. १८ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजता तो कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. तो परत न आल्याने कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, १९ जुलै रोजी दसरखेड येथील गोविंदराव वामनराव डोसे यांच्या शेतातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याची माहिती गावकऱ्यांनी कुटुंबीयांना दिली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह राहुल नरोटे याचाच असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी राहुलचा भाऊ चिंतामण मधुकर नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी मर्ग क्र. ११/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.