मलकापूर :- तालुक्यातील दुधलगाव बु. येथे अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून दोन बैल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुधलगाव बु. येथील शेतकरी अभिषेक विष्णू नारखेडे (वय २५) यांच्या मालकीचे सुमारे ९० हजार रुपये किमतीचे दोन बैल गोठ्यात बांधून ठेवण्यात आले होते. १८ जुलै रोजी रात्री १० वाजेपासून १९ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून बैल चोरून नेल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच अभिषेक नारखेडे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता मोरे करीत असून, चोरीस गेलेल्या बैलांचा आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.