Headlines

शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार-स्टार्टर चोरीने चिंता वाढली, चिचखेड परिसरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; २८ हजारांचे साहित्य लंपास

 

मेरा बु. : शेतीसाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता नैसर्गिक संकटांसोबतच चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाचाही सामना करावा लागत आहे. चिचखेड शिवारात शेतातील विद्युत मोटार, स्टार्टर व वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिचखेड येथील रहिवासी रवींद्र नर्सिंग देशमुख (वय ३९) यांची गट क्रमांक २०० मध्ये पाच एकर शेती आहे. शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी चोखामेळा सागर धरणाच्या बुडीत क्षेत्राजवळ टेक्समो कंपनीची विद्युत मोटार व स्टार्टर बसवले होते. ३ मे रोजी पहाटे ऊस पिकाला पाणी देण्यासाठी ते शेतात गेले असता मोटार, स्टार्टर व जोडणीसाठी वापरण्यात आलेले वायर जागेवरून गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडे चौकशी केली; मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अंदाजे २८ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी रवींद्र देशमुख यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!