शेगाव : दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात घडली. लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण केल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन राजू तायडे (वय ४०, रा. धनगर नगर, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख जावेद शेख करीम (वय अंदाजे ३०, रा. काँग्रेस नगर, शेगाव) याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हा क्रमांक ३०५/२०२६ असा आहे. ही घटना १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील आठवडी बाजार परिसरातील बजरंग बली मंदिराजवळ घडली. मृत तरुणाचे नाव शाहरुख हारून पटेल (वय अंदाजे ३१, रा. शेगाव) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे दोघे एकत्र बसून मद्यपान करत होते. यावेळी दारूच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी शेख जावेद याने शाहरुख पटेल याच्यावर लाकडी दांड्याने डोक्यात जोरदार प्रहार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने शाहरुखचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे हे प्रकरणाचा तपास करीत असून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला.