अंढेरा : मद्यधुंद अवस्थेत भरधाव दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५६ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २३ जून रोजी अंढेरा फाटा ते अंढेरा मार्गावर घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंढेरा येथील मधुकर सानप यांचा मुलगा पवन याची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. कर्तव्यावर रुजू होण्यासाठी तो बुधवारी रवाना होणार असल्याने त्याला निरोप देण्यासाठी सुखदेव भगवान मुंढे (वय ५६, रा. नरशीह उमदर) व त्यांचे साडू एकनाथ पालवे हे गावाकडे पायी जात होते. दरम्यान, अंढेरा फाट्याकडून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने दुचाकी चालवत येणाऱ्या आकाश अंकुश गुंजकर (वय २२) याने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुखदेव मुंढे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ते रस्त्यावर कोसळले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी जप्त केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.