Headlines

लग्नाला गेलेल्या दाम्पत्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; मका-गहू विक्रीचे अडीच लाख रुपये लंपास

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर येथे लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत पेटी फोडून तब्बल अडीच लाखांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतमाल विक्रीतून जमा केलेली ही रक्कम असल्याने परिसरातील शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, इब्राहिमपूर (पोस्ट बोराखेडी) येथील अनिल सावजी श्रीनाथ हे पत्नीसमवेत तोंडापूर येथे लग्नकार्याकरिता गेले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन पेट्या फोडून त्यामधील रोकड चोरट्यांनी लंपास केली.
घटनेची माहिती फिर्यादींना त्यांच्या भावजयीकडून फोनद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घरी धाव घेतली. घरात पाहणी केली असता पेट्या फोडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यामध्ये कपड्यांमध्ये ठेवलेली मका व गहू विक्रीची सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी अनिल श्रीनाथ यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. श्रीकांत चिटवार करीत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात वाढत असलेल्या घरफोड्यांच्या घटनांमुळे इब्राहिमपूर, कोथळीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!