शेगाव : शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडसी हातसफाई करत एसबीआय बँकेसमोर उभी असलेल्या स्कुटीची डिक्की फोडून ३५ हजार रुपये लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बँक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फरशी जामा मशिदीजवळ राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद याकूब (वय ४७) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पार्टनर मोहम्मद इरफान मोहम्मद यांच्या खात्यात प्लॉट व्यवहारातून ३ लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा झाले होते. त्यापैकी १ लाख रुपये काढण्यासाठी दोघेही ७ मे रोजी दुपारी मेन रोडवरील एसबीआय बँकेत गेले होते. बँकेत जाण्यापूर्वी मोहम्मद शरीफ यांनी ३५ हजार रुपये त्यांच्या अॅक्सेस स्कुटी क्रमांक एमएच ३० बीएफ ७१६२ च्या डिक्कीत ठेवले, तर उर्वरित ६५ हजार रुपये खिशात ठेवले होते. त्यानंतर ते नमाज पठणासाठी कच्चे मशिदीकडे गेले. दरम्यान त्यांचा मित्र बँकेतच थांबला होता. नमाज आटोपून परत आल्यानंतर स्कुटीची डिक्की उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता डिक्कीत ठेवलेली ३५ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे समोर आले. परिसरात शोधाशोध करूनही चोरट्याचा कोणताही मागमूस लागला नाही. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका संतोष गवई करीत आहेत.