बुलढाणाः जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पहाटेच्या सुमारास शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून पोलीस कोठडीतून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या सहा तासांत फरार आरोपीचा माग काढत त्याला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून जेरबंद केले. आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी मलकापूर पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रतापसिंग सुरजसिंग बावरी (वय २०) व कपूरसिंग सुरजसिंग बावरी (वय २५, दोघेही रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) यांना ७ सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे आणण्यात आले होते. दरम्यान, पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास संधी साधून प्रतापसिंग बावरी याने रुग्णालयातील शौचालयाच्या खिडकीतून उडी मारत पलायन केले. आरोपी पोलीस ताब्यातून फरार झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे फरार आरोपी बुलढाण्यावरून मलकापूरमार्गे भुसावळच्या दिशेने गेल्याचा माग काढला. त्यानंतर पथकाने तातडीने जळगाव जिल्ह्यात धाव घेत भुसावळ येथील दीप नगर परिसरात सापळा रचला. अखेर फरार प्रतापसिंग बावरी याच्यासह त्याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा भाऊ तुफानसिंग सुरजसिंग बावरी (वय १९) याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल व एक बजाज पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी मलकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस ताब्यातून पळून गेल्याप्रकरणी प्रतापसिंग बावरी याच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २६२ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.