देऊळगाव राजा : शेळ्या चारण्यासाठी सोडलेल्या ठिकाणी परतल्यानंतर एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन बकऱ्या आणि दोन लहान पिल्ले गायब असल्याचे निदर्शनास आले. शहरातील तहसील कार्यालयासमोरील कब्रस्तान परिसरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या शेळ्या-बकऱ्या चोरून नेल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकारामुळे शेळीपालन करणाऱ्या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला असून, देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमृतनगर येथील जाहेदाबी दिलदार शाहा (वय ६०) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जाहेदाबी शाहा या शेळीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीच्या तीन बकऱ्या व दोन लहान पिल्ले अशी अंदाजे ६० हजार रुपये किमतीची जनावरे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान तहसील कार्यालयासमोरील कब्रस्तान परिसरात सोडण्यात आली होती. काही वेळाने त्या पुन्हा जनावरांच्या ठिकाणी गेल्या असता तीन बकऱ्या आणि दोन पिल्ले जागेवर दिसून आली नाहीत. आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने संधी साधून बकऱ्या व पिल्ले चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जाहेदाबी शाहा यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कायमी गुन्हा क्रमांक ४०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सफौ नारायण गिते करीत असून, चोरीस गेलेल्या बकऱ्या व पिल्लांचा तसेच अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.