५०० रुपयांच्या वादातून तरुणावर हल्ला; काचेच्या शिशीने डोळ्याजवळ दुखापत

देऊळगाव राजा : अवघ्या ५०० रुपयांच्या सायकल व्यवहारातून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूप हिंसक हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना सावखेड भोई व भिवगाव परिसरात घडली. काकांना मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणालाच आरोपींनी गाडीत बसवून भिवगाव येथे नेले आणि सामूहिक मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी काचेच्या शिशीने डाव्या डोळ्याजवळ वार करून दुखापत केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून, देऊळगाव राजा पोलिसांनी चौघांसह पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश दिलीप राऊत (वय ३३, रा. अंबक नगर, देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या काकांचा शुभम किशोर डोंगरे याच्यासोबत सायकलचा व्यवहार झाला होता. या व्यवहारातील उर्वरित ५०० रुपये देणे बाकी असल्याच्या कारणावरून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता सावखेड भोई येथे वाद निर्माण झाला. तक्रारीनुसार, किशोर उत्तम डोंगरे याने फिर्यादीच्या काकांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शुभम डोंगरे, किशोर डोंगरे व आतिष गणेश वाघमारे यांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. काकांना सोडविण्यासाठी मंगेश राऊत गेले असता आरोपींनी त्यांनाही पकडले. त्यानंतर आरोपींसह पाच अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला वाहनात बसवून भिवगाव येथे नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. तेथे सर्वांनी मिळून शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, एका आरोपीने काचेची शिशी फिर्यादीच्या डाव्या डोळ्याजवळ मारल्याने त्यांना दुखापत झाली. तर एका अनोळखी व्यक्तीने पट्ट्याने पाठीवर मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक ३९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार चौघांसह पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!