मलकापूर : “निरागस मुलांच्या हातातील पैशांवर डोळा ठेवणाऱ्यांनी समाजातील सुरक्षिततेलाच आव्हान दिले,” अशी संतापजनक घटना मलकापूर शहरात घडली आहे. शिकवणीचे शुल्क भरण्यासाठी दिलेले १६ हजार रुपये दोन शाळकरी मुलांना जीवे मारण्याची धमकी देत हिसकावून नेल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
शहरातील अहमदशाहपूरा परिसरातील अहमदिया मशिदीजवळ बुधवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदशाहपूरा येथील सय्यद अलीयार सय्यद सुलतान हे नंदुरबारला जाणार असल्याने त्यांनी दोन शाळकरी मुलांकडे शिकवणीचे शुल्क भरण्यासाठी १६ हजार रुपये दिले होते. पैसे घेऊन मुले घरी परतत असताना दोन जणांनी त्यांना अडविले. यावेळी एका आरोपीने मुलांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांना पकडून ठेवले, तर दुसऱ्या आरोपीने एका मुलाच्या खिशातील १६ हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी सय्यद अलीयार सय्यद सुलतान यांच्या तक्रारीवरून शेख हाफीज शेख रशीद उर्फ जाधव व मो. रेहान शेख बुडन उर्फ रिजवान बिल्डर (दोघे रा. हाश्मीनगर, मलकापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत झेडगे करीत असून, पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे. शाळकरी मुलांनाच लक्ष्य करून घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.