Headlines

संतापजनक! कोयत्याचा धाक दाखवत महिलेला जबरदस्तीने झोपडीबाहेर ओढत नेत आळीपाळीने अत्याचार; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर:- रात्रीच्या अंधारात दोन नराधमांनी मानवतेलाच काळिमा फासणारे कृत्य करत एका गरीब शेतमजूर विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हातात कोयता आणि विळा घेऊन झोपडीत घुसलेल्या आरोपींनी प्रथम पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर १९ वर्षीय विवाहित महिलेला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे घडली. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दुधलगाव बुद्रुक येथील लोणवडी शिवारात मध्यप्रदेशातील आदिवासी ‘पावरा’ समाजातील एक कुटुंब शेतमजुरीसाठी वास्तव्यास आहे. १७ जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास १९ वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीसह झोपडीत झोपलेली असताना दोन अज्ञात इसमांनी बेकायदेशीरपणे झोपडीत प्रवेश केला. आरोपींनी हातातील कोयता व विळ्याचा धाक दाखवत पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. मात्र, गरीब मजूर कुटुंबाकडे पैसे नसल्याचे समजताच आरोपींचा संताप अनावर झाला. यानंतर आरोपींनी विवाहित महिलेला जबरदस्तीने झोपडीबाहेर ओढत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या भीषण घटनेमुळे पीडित महिला आणि तिचे कुटुंब प्रचंड मानसिक धक्क्यात असून, परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला गती दिली. पीडित महिलेला तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ७०(१), ३०९(४), ३११, ३३३, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोजीरोटीसाठी परराज्यातून आलेल्या गरीब शेतमजूर कुटुंबावर ओढवलेल्या या अमानुष अत्याचारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!