चिखली :- “ज्या मातीत स्वप्नांना आकार मिळाला, त्या मातीत समाजसेवेचे ऋण फेडणे हीच खरी कृतज्ञता,” या भावनेतून त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी चिखली शहरात दर गुरुवारी निःशुल्क रुग्णसेवा सुरू केली आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये त्वचा, केस व नखांच्या आजारांवरील प्रभावी उपचारांमुळे हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केलेल्या डॉ. गोंधणे यांनी आता आपल्या जडणघडणीच्या शहरात समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत ही सेवा सुरू केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार आहे. या निःशुल्क सेवेमध्ये त्वचा, केस व नखांचे विविध आजार, अॅलर्जी, बुरशीजन्य संसर्ग, मुरुम, सोरायसिस, पांढरे डाग, केस गळणे आदी समस्यांवर वैद्यकीय तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. रुग्णांच्या प्रकृतीनुसार आवश्यक त्या पुढील उपचारांबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत डॉ. तुषार गोंधणे यांनी नागरिकांना या निःशुल्क सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, प्रत्येक गुरुवारी वेळेत उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असे सांगितले आहे. समाजाभिमुख आरोग्यसेवेच्या दिशेने उचललेले हे पाऊल चिखली परिसरातील गरजू रुग्णांसाठी आशादायी ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.