Headlines

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

बुलढाणा : पुणे येथील आयटी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील आरती शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह २२ मे २०२२ रोजी पुणे येथील करण शेळके याच्यासोबत झाला. लग्नावेळी पतीला रोख रक्कम, सोन्याची अंगठी व चैनीच्या वस्तू देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर पती व सासू-सासऱ्यांनी अतिरिक्त सोने व पैशांची मागणी करून टोमणे मारत त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. फोटोग्राफरचे पैसे, घरातील फर्निचर तसेच इतर कारणांसाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्रासाला कंटाळून आरती यांनी त्यांच्या नावावर ७ लाख रुपयांचे कर्ज काढून दिले, तरीही छळ सुरूच राहिल्याचा आरोप आहे. तसेच गरोदर असताना घराबाहेर काढल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुन्हा पुणे येथे गेल्यानंतर सासूने मारहाण करून घराबाहेर काढले तसेच खोटी तक्रार देऊन, पुन्हा पुण्यात दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आरती यांनी केला आहे. याप्रकरणी पती करण राजू शेळके, सासू कल्पना राजू शेळके व सासरे राजू शेळके यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!