Headlines

वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनाला चोरट्याने केले टार्गेट; मंडळ अधिकाऱ्याची ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉपसह कागदपत्रे लंपास

सुलतानपूर : शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली की वाहनचालकांचे लक्ष रस्ता मोकळा करण्याकडे असते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करण्याची संधी शोधत असल्याचे समोर आले आहे. सुलतानपूर शहरात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेत एका मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधील रोख रक्कम आणि शासकीय साहित्य चोरट्याने लंपास केले. या प्रकारामुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी लक्ष्मण नारायण सानप हे मेहक येथून स्वतःच्या चारचाकी वाहनाने लोणारकडे जात होते. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असल्याने ते प्रवासात असताना सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान त्यांचे वाहन सुलतानपूर शहरात दाखल झाले. यावेळी शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने त्यांची कार गर्दीत अडकली होती. वाहन पुढे नेण्याच्या प्रयत्नात सानप यांचे लक्ष वाहतुकीकडे असतानाच अज्ञात चोरट्याने संधी साधत कारमधील बॅग लंपास केली. या बॅगेत तब्बल ५० हजार रुपयांची रोख रक्कम, शासकीय कार्यालयीन लॅपटॉप तसेच महत्त्वाच्या प्रशासकीय फाईल्स आणि कागदपत्रे होती. वाहतूक कोंडी दूर झाल्यानंतर काही वेळाने बॅग चोरीला गेल्याचे सानप यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सुलतानपूर बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार, राजेश जाधव आणि एपीआय अवचार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी, तेही दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ रोख रक्कमच नव्हे, तर शासकीय लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला गेल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *