Headlines

अपघातानंतर मदतीसाठी धावलेल्यांनाच अडविल्याचा आरोप; तरुणाचा मृत्यू, महिला गंभीर! संग्रामपूर येथील घटना

संग्रामपूर : दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात एका ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. मात्र, अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी काही जणांनी मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना अडविल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास संग्रामपूर तालुक्यातील भोन फाट्याजवळ हा अपघात घडला. हिंगणा कवळा येथील दीपक प्रल्हाद अढाळे (वय ३८) हे एमएच २८ सीबी ३१८६ क्रमांकाच्या दुचाकीने कवठळ मार्गाने जात होते. त्यांच्या दुचाकीवर भोन येथील तुळसाबाई भामद्रे या मागे बसलेल्या होत्या. दरम्यान, भोन फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घसरले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न सुरू असताना काही जणांनी अडथळा निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात अडचणी आल्याचे नमूद आहे. तब्बल तासाभरानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर दोघांनाही शेगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दीपक अढाळे यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी तुळसाबाई भामद्रे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी आनंद विलास प्रल्हाद अढाळे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी दीपक अढाळे (रा. हिंगणा कवळा), नंदकिशोर सदाशिव फाळके, अनंता जगन्नाथ तराळे, जगन्नाथ तराळे, अभिलाष मुकिव आणि संदीप भामराव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), ३(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *