मलकापूर : संसाराचा गाडा चालवण्यासाठी जनता महाविद्यालयाजवळ सायकल दुरुस्तीचे छोटेसे दुकान थाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका कष्टकरी व्यक्तीच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. पतीच्या निधनाने पत्नीचा आधार हरपला, तर तीन मुली आणि एका मुलाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील माता महाकाली नगरातील रहिवासी बाळू किसन ढोले (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर-घिर्णी रस्त्यावरील एका शेतात दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने झाडाला गळफास घेतल्याची माहिती नागरिकांना मिळाली. घटनेची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी मृत व्यक्तीची ओळख बाळू किसन ढोले अशी पटली. जनता महाविद्यालयाजवळ त्यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान होते. या दुकानाच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाळू ढोले यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ज्या वडिलांच्या कष्टावर मुलांच्या भविष्याची स्वप्ने उभी होती, तोच आधार अचानक हरपल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः लहान मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.