Headlines

गळफास घेऊन ४० वर्षीय युवकाची आत्महत्या; निमगावात शोककळा

नांदुरा : तालुक्यातील निमगाव येथील एका ४० वर्षीय युवकाने प्लॉटिंग परिसरातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. किसना सुखदेव ईवरकार (४०, रा. निमगाव) असे मृत युवकाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, किसना ईवरकार यांचा मुलगा युवराज याने पहाटेच्या सुमारास काका विष्णू जगदेव ईवरकार यांना उठवून वडिलांनी दत्तनगर परिसरातील प्लॉटिंगमधील निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच विष्णू ईवरकार यांनी गजानन इंगळे, प्रकाश मुरहे व पुरुषोत्तम दळवी यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथे किसना ईवरकार हे मृतावस्थेत आढळून आले. किसना ईवरकार यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी माहिती फिर्यादीने दिली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विष्णू ईवरकार यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेने निमगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!