नांदुरा : घरात कोणी नसल्याची संधी साधून घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना महिलेने हटकताच एकाने चाकूचा धाक दाखवून तिला धक्का दिला. त्यानंतर मोटारसायकलवरून पसार होणाऱ्या दोघांचा नातेवाईकांनी पाठलाग करून त्यांना पकडले. खुमगाव बुट्टी येथे शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
खुमगाव बुट्टी येथील सुलोचना संजय सातव (४०) या त्यांच्या सासू सुशिलाबाई पंढरी सातव यांच्या घरी जेवण घेऊन जात असताना त्यांना विनायक श्रीराम सातव यांच्या घरासमोर एक अनोळखी व्यक्ती उभा असल्याचे दिसले. सुलोचना यांनी त्याची चौकशी केली असता, मुलाला भेटण्यासाठी आल्याचे सांगून तो मोटारसायकलवरून निघून गेला. मात्र, काही वेळातच त्याच घरातून आणखी एक अनोळखी इसम बाहेर येताना सुलोचना सातव यांना दिसला. संशय आल्याने त्यांनी त्याला हटकत ‘तू चोर आहेस का?’ अशी विचारणा केली. यावेळी त्याने जवळील चाकू काढून सुलोचना यांना धक्का दिला आणि तेथून पळ काढला. त्यानंतर दोघेही एकाच मोटारसायकलवरून पसार होऊ लागले.
दरम्यान, सुलोचना यांनी घराची पाहणी केली असता घराचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घरफोडीचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने दोन्ही संशयितांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना पकडण्यात यश मिळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोटारसायकल क्रमांक एमएच १९ एव्ही ३०५८ असल्याचे समोर आले. पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे अजय सुकलालधर्मारा कुवरदेव (रा. जळगाव जामोद) आणि संजय नामदेव चिंचोळकर (रा. केलपाणी, ता. अकोट) अशी आहेत.
सुलोचना सातव यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ डाबेराव करीत आहेत. घरफोडीमागील नेमका उद्देश तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.