हॉटेलमध्ये पायाने मैदा तुडवल्याचा व्हिडिओ व्हायरल; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जानेफळ : नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार जानेफळ येथे उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये समोसा, कचोरी व अन्य नाश्ता पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा एका कामगाराकडून पायाने तुडवला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित हॉटेल व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
जानेफळ येथील बसस्थानक चौकातील अमडापूर रोडवरील ‘जय अंबे स्वीट मार्ट’ या हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांच्या पथकाने १८ जून रोजी हॉटेलवर छापा टाकून तपासणी केली. यावेळी हॉटेलमधील खाद्यसाहित्य तसेच हॉटेल मालकाच्या घरी तयार करण्यात येणाऱ्या साहित्याची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बेसन, मैदा, तेल व इतर खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करण्यात आले. तपासादरम्यान व्हिडिओमध्ये दिसणारा कामगार माधाराम गोकलराम प्रजापत याला कामावरून काढून टाकल्याची माहिती हॉटेल मालकाने अधिकाऱ्यांना दिली. मात्र, अशा प्रकारे अन्नपदार्थ तयार करून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपाळे यांच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम ५९(२) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २७४ व २७५ अन्वये कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा प्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून खाद्यपदार्थांच्या स्वच्छता व गुणवत्तेबाबत अधिक कडक तपासण्या करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!