Headlines

“विदर्भ लाईव्ह’च्या बातमीचा इम्पॅक्ट! प्रशासन जागे; मलकापूर शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईला अखेर सुरुवात”

मलकापूर:- बुलढाणा रोडवरील सांडपाणी, दुर्गंधी आणि तुंबलेल्या नाल्यांबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची अखेर दखल घेत नगरपालिका प्रशासनाने हालचाल सुरू केली असून, शहरातील मुख्य नाल्यांच्या साफसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील बुलढाणा रोड परिसरात तुंबलेल्या नाल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येबाबत “विदर्भ लाईव्ह”ने वृत्त प्रकाशित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वृत्तानंतर अखेर नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून, मलकापूर शहरातील मुख्य नाल्यांच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागांतील नाल्या गच्च भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आणि दुकानांमध्ये शिरत होते. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
दरम्यान, “नाल्या तुंबल्या, शहर दुर्गंधीत बुडाले; तक्रारींनंतरही पालिका ‘कुंभकर्णी’ झोपेत!” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीने शहरात मोठी चर्चा रंगली होती. अखेर या वृत्ताची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मुख्य नाल्यांमधील गाळ, कचरा आणि साचलेली घाण काढण्याचे काम हाती घेतले आहे. पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले असले, तरी ही कारवाई केवळ तात्पुरती न राहता नियमितपणे शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या या हालचालीमुळे “पत्रकारितेच्या आवाजाला अखेर यश” मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, शहरातील इतर समस्यांवरही अशाच प्रकारे तातडीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!