मलकापूर :- शहरात वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाबाबत नागरिकांच्या तीव्र नाराजीचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिका प्रशासन अखेर जागे झाले असून शहरात धूर फवारणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. ‘विदर्भ लाईव्हने या गंभीर समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील गल्लोगल्ली डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात पालिकेकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत होता. दरम्यान, या समस्येवर प्रकाश टाकणारी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. शहरातील विविध भागांमध्ये धूर फवारणी करण्यात येत असून, काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेलाही गती देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असले तरी, ही मोहीम सातत्याने राबवावी व केवळ दिखाऊ न राहता प्रभावी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.