Headlines

कर्तव्य बजावताना अपमान; मलकापूरात वाहतूक पोलिसांप्रती सहानुभूतीची लाट!

( उमेश ईटणारे )
मलकापूर : – वाहतूक पोलीस होणे खरोखरच सोपे आहे का? हा प्रश्न उपस्थित करणारी एक भावनिक घटना शहरातील बसस्थानकासमोर घडली. कर्तव्य बजावत असलेल्या एका प्रामाणिक वाहतूक पोलिसाला नागरिकांसमोर अपमानास्पद वागणूक मिळाल्याने उपस्थितांच्या मनाला चटका बसला. माहितीनुसार, बसस्थानकासमोरील रस्त्यावर एक व्यक्ती मोटरसायकल उभी करून चहाच्या टपरीवर थांबला होता. त्याचवेळी वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी कैलास सोनवणे यांनी नियमाप्रमाणे वाहनावर दंडाची कारवाई सुरू केली. मात्र हे पाहून संबंधित इसम संतप्त झाला आणि मद्यधुंद अवस्थेत त्याने थेट पोलिसांच्या अंगावर धाव घेतली.
इतक्यावरच न थांबता त्या व्यक्तीने पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवरही अश्लील शब्दांचा वापर केला, तसेच त्यांचा बकल नंबर विचारत धमकावण्याचाही प्रयत्न केला. ही घटना पाहून तेथे उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. कैलास सोनवणे हे मलकापूर शहरात प्रामाणिक, नम्र व कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलीस म्हणून ओळखले जातात. परिस्थितीनुसार समज देऊन नागरिकांना मदत करणारा त्यांचा स्वभाव सर्वपरिचित आहे. मात्र अशा पोलिसाला सार्वजनिक ठिकाणी अपमान सहन करावा लागणे ही खेदजनक बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेनंतर पोलीसही माणूसच आहे, याची जाणीव ठेवून त्यांच्या कार्याचा आदर करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वाहतूक पोलिसांचे काम केवळ दंड वसूल करणे नसून, शहरातील शिस्त आणि सुरक्षितता राखणे हे आहे, आणि त्यासाठी त्यांना सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश या घटनेतून पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!