Headlines

मलकापुरात व्यापाऱ्याला जंगलात नेऊन लुटले; २.६९ लाखांचा ऐवज गायब; अधिक नफ्याचे आमिष दाखवून तेलंगणातील व्यापाऱ्याला बोलावले; सहा जणांकडून मारहाण, चाकूचा धाक, रोख रकमेसह ऑनलाइन खात्यातूनही पैसे वळते

मलकापूर : जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तेलंगणातील व्यापाऱ्याला मलकापुरात बोलावण्यात आले. त्यानंतर शहरातील राम मंदिर परिसरातून दुचाकीवर बसवून निर्जन जंगल भागात नेण्यात आले. तेथे सहा जणांनी व्यापारी व त्याच्या चालकाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल हिसकावले. एवढ्यावरच न थांबता जबरदस्तीने यूपीआय व्यवहार करून खात्यातील पैसेही काढून घेतल्याने एकूण २ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी सहा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्याच्या नस्कलगाव येथील सिरा भानू (२८) हे मेंढ्या-बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. २३ ऑक्टोबर रोजी ते मेहुणा प्रोहित व चालक प्रवीण यांच्यासोबत नविपेट येथे गेले असताना एका चहाच्या टपरीवर अनोळखी व्यक्तीने त्यांना मलकापुरात चांगला व्यवसाय आणि अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवले. संबंधित व्यक्तीने मोबाईल क्रमांक व लोकेशन पाठवल्याने त्यावर विश्वास ठेवून तिघेही २४ ऑक्टोबर रोजी सकाळी मलकापुरातील राम मंदिर परिसरात पोहोचले. तेथे मास्क घातलेल्या व्यक्तीने भानू व चालक प्रवीण यांना मोटारसायकलवर बसवून मंदिरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील निर्जन जंगल परिसरात नेले. या ठिकाणी आधीच सहा जण दबा धरून बसले होते. त्यांनी दोघांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून सुमारे ८१ हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी, साखळी व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर फोनपे व यूपीआय पिन जबरदस्तीने मिळवून भानू यांच्या खात्यातून ९० हजार, तर मेहुणा प्रोहित यांच्या खात्यातून ५० हजार रुपये ऑनलाइन वळते करून घेतले. याचदरम्यान चालक प्रवीण यांचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. परिसरात काही लोक येताना दिसल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर भानू व प्रवीण यांनी बायपासवर पोहोचून मेहुण्याला बोलावले आणि तिघे दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मलकापुरातून निघून गेले. घटनेनंतर फिर्यादीने सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार केली होती. तसेच ३ नोव्हेंबर रोजी मेडक येथे लेखी तक्रार दिल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०८९०/२०२६, कलम ३१०(२) बीएनएसनुसार सहा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *