मलकापूर :- उसने दिलेल्या पैशांच्या वादातून एका तरुणावर बांधकामस्थळी हल्ला करून मारहाण केल्याची घटना शहरातील राणा प्रताप नगर परिसरात घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीसह दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, गौरव राजू दहीभाते (वय 30, रा. शिवाजी नगर) यांचे जनता कॉलेज समोरील चायनीज दुकान आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी कृष्णा सुरेश काचकुटे (रा. गणपती नगर भाग-१) याला 20 हजार रुपये उसने दिले होते. मात्र पैसे परत मागितल्यावर आरोपीने वाद घालत टाळाटाळ केली. दरम्यान, 17 एप्रिल रोजी रात्री 9 ते 10 वाजताच्या सुमारास दहीभाते यांच्या राणा प्रताप नगर येथील बांधकामस्थळी दगडफेक होत असल्याची माहिती वॉचमन गजानन तळेकर यांनी दिली. त्यानंतर दहीभाते घटनास्थळी पोहोचले असता तेथे क्रीष्णा काचकुटे व त्याचे दोन अनोळखी साथीदार आढळले. यावेळी विचारणा करताच आरोपी क्रीष्णा काचकुटे याने हातातील कड्याने दहीभाते यांच्या डोक्यात मारहाण केली. तसेच इतर दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. घटनेनंतर आरोपी तिघेही दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी गौरव दहीभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी क्रीष्णा काचकुटे सह 2 अनोळखी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहे.