Headlines

पाणी पिण्यासाठी उतरला, चोरट्याने बॅगच पळविली; मलकापूर बस स्थानकातील घटना

मलकापूर : बसस्थानक परिसरात क्षणभराच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वैद्यकीय प्रतिनिधीची महत्त्वाची कागदपत्रे, बँक कार्डे आणि सुमारे २५ हजार रुपये किमतीचा टॅब असलेली बॅग लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
अकोट येथील अभिजित प्रमोद जवरकर (३४) हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, ते अकोट-जळगाव एसटी बसने प्रवास करीत होते. मलकापूर बसस्थानकाजवळील रुद्रांश दुकान परिसरात बस थांबल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी खाली उतरले. यावेळी त्यांनी आपली बॅग जमिनीवर ठेवली होती. मात्र, पाणी पिऊन परत आल्यानंतर बॅग जागेवरून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जवरकर यांनी परिसरात बॅगेचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. चोरीला गेलेल्या बॅगेत सुमारे २५ हजार रुपये किमतीचा टॅब, कंपनीची वर्किंग बॅग, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, बँकेची क्रेडिट व डेबिट कार्डे तसेच कंपनीच्या कामाशी संबंधित महत्त्वाचे साहित्य व कागदपत्रे होती.
अज्ञात चोरट्याने संधी साधून बॅग चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!