Headlines

“तू दिसायला चांगली नाहीस” असे म्हणत ५० हजारांसाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ७ जणांवर गुन्हा

मोताळा : सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून सासरच्या उंबऱ्यात पाऊल ठेवलेल्या १८ वर्षीय नवविवाहितेच्या वाट्याला मात्र छळ आणि अपमान आला. तू दिसायला चांगली नाहीस, असे हिणवत माहेरहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पतीसह सासरकडील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा येथील सुलतानाबी शेख अजीम या विवाहितेचा लग्नानंतर काही दिवसांतच सासरी छळ सुरू झाला. सौंदर्यावरून वारंवार हिणवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच माहेरहून ५० हजार रुपये आणले नाही तर जीवाने मारून टाकू, अशा धमक्या दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने भरोसा सेलकडे न्यायाची याचना केली. भरोसा सेलच्या आदेशानंतर बोराखेडी पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी पीडितेचा पती शेख अजीम शेख बशीर, सासू आलीशान बी शेख बशीर, दिर शेख वसीम शेख बशीर, जेठानी तबस्सुम शेख वसीम (सर्व रा. धाड) तसेच नंदोई शेख साजीद शेख अजीज, नणंद आसमा बी शेख साजीद आणि नणंदेचा सासरा शेख मुसा शेख नजीर (सर्व रा. मोताळा) अशा सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!