दुधलगावातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघे जेरबंद; चार दिवसांची पोलीस कोठडी

मलकापूर : शेतात राहणाऱ्या १९ वर्षीय महिलेवर कोयता-विळ्याचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास करत मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अखेर दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. तब्बल महिनाभरानंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधलगाव बु. येथील लोणवडी शिवारात संजय भारंबे यांच्या शेतात मध्यप्रदेशातील आदिवासी पावरा कुटुंब मजुरीच्या कामासाठी वास्तव्यास होते. १७ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास १९ वर्षीय महिला पतीसोबत झोपडीत मोबाईल पाहत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी तेथे प्रवेश केला. आरोपींनी महिलेच्या पतीला कोयता व विळ्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे पैसे नसल्याचे समजल्यानंतर दोघांनी महिलेला झोपडीपासून बाजूला नेले. तेथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी राकेश महेंद्रसिंग भिलाला (२२, रा. जामठी, ता. जि. बऱ्हाणपूर) आणि जामसिंग रोशन भिलाला (२२, रा. जामठी, ता. जि. बऱ्हाणपूर) या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणातील घटनेचा नेमका घटनाक्रम, आरोपींचा सहभाग आणि अन्य बाबींचा तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!