मलकापूर : बनावट चलनाचा व्यवहार करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका शेतकऱ्याला सापळ्यात ओढून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहराजवळील कुंड फाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी सात जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध दरोडा, मारहाण व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड सोनेवाडी येथील सुभाष माणिकराव गावंडे (वय ५०) यांच्याशी आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधून बनावट नोटांच्या व्यवहारासाठी कुंड फाट्यावरील एका हॉटेलसमोर बोलावले. गावंडे हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून तेथे पोहोचल्यानंतर दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्यांना एक लाख रुपयांच्या व्यवहाराचे आमिष दाखवत नोटांचे बंडल दाखवले. नोटा संशयास्पद असल्याचे लक्षात येताच गावंडे यांनी व्यवहार करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपींनी संताप व्यक्त करत त्यांना मारहाण केली. तसेच धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील ५ हजार रुपयांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर मलकापूर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मयुर सुनिल खानझोडे, अभिषेक भिमराव इंगळे, अमर सोनोने, सुपेश पाटील, गोलू भिसे, विश्वा तसेच अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपींकडून ‘भारतीय बच्चो का बँक’ असा मजकूर असलेल्या ५०० रुपयांच्या २ हजार बनावट नोटा, लुटीतील ५ हजार रुपयांची रोकड, धारदार चाकू, स्प्लेंडर प्लस मोटारसायकल आणि विविध कंपन्यांचे चार अँड्रॉइड मोबाईल असा सुमारे २ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.