Headlines

सिलेंडर स्फोटात वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू अशोकनगरातील टिनपत्राच्या घराला आग; परिसरात हळहळ, मलकापुरातील घटना

मलकापूर : शहरातील अशोकनगर परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण सिलेंडर स्फोटात एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भर दुपारी लागलेल्या आगीने काही क्षणांत उग्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
माहितीनुसार, अशोकनगर येथे राहणाऱ्या नर्मदाबाई सुखदेव लासुरकर (वय ७५) या टिनपत्राच्या भाड्याच्या खोलीत एकट्याच वास्तव्यास होत्या. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घराशेजारी साचलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. प्रचंड उष्णता आणि वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत नर्मदाबाई यांच्या घरापर्यंत पोहोचली. आगीने घराला वेढा घातल्यानंतर घरातील गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांत मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात घुमल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत नर्मदाबाई या गंभीररीत्या भाजल्या गेल्या होत्या. त्यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, रचना गॅस एजन्सीचे मालक मनीष लखानी यांनीही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर अशोकनगर परिसरात शोककळा पसरली असून, एका वृद्ध महिलेचा आगीत झालेला दुर्दैवी अंत नागरिकांना चटका लावून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!