Headlines

बसस्थानकासमोरील हायमास्ट पोल ठरतोय वाहतुकीसाठी अडसर; बुलढाणा रोडवर 500 मीटर पर्यंत वाहणांच्या रांगा! नागरिकांकडून हटविण्याची मागणी जोरात

मलकापूर : – शहरातील बसस्थानकासमोरील बुलढाणा रोडवर उभारण्यात आलेला हायमास्ट लाईट पोल सध्या वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत असून, नागरिकांसह एसटी चालकांकडून तो तातडीने हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या या पोलमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, वर्षभरापूर्वी पालिका प्रशासनाकडून बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर हायमास्ट लाईट पोल बसविण्यात आला होता. बुलढाणा रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि आधीच अरुंद मार्ग असल्याने या पोलमुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. परिणामी, बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बस चालकांना वळण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. आज दि.12 रोजी सकाळीही दोन्ही बाजूंनी सुमारे पाचशे मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या वेळी वाहतूक पोलीस हजर नसल्याने पोलिस कर्मचारी पंकज वराडे, व निलेश तायडे यांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेताना वाहतुकीत अडकून वेळ वाया जात असल्याने एखादी जीवितहानी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पालिकेने पूर्वनियोजन न करता हा पोल उभारल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता संबंधित हायमास्ट पोल अन्यत्र हलवावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!