जळगाव जामोद : प्लॉट मोजणीच्या कामासाठी नागरिकाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १२ मे रोजी जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावावरील प्लॉटची मोजणी व्हावी यासाठी आवश्यक शासकीय शुल्क भरून ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जातील त्रुटींचे कारण पुढे करत संबंधित काम प्रलंबित ठेवण्यात आले. त्यानंतर भूमापकाने तक्रारदाराला कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकाला भेटण्यास सांगितले. सहाय्यकाने प्लॉट मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी केली. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. दरम्यान, १२ मे रोजी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना भूमापक विश्वजीत विनायक सोनाने (वय ५३) व मुख्यालय सहाय्यक सचिन सदाशिव वाजपे (वय ४८) यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी दोघांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे व पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.