खामगाव : वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान दारू पिण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन एका युवकावर बियरच्या काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आल्याची घटना खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शिरसगाव देशमुख येथे घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल मनोहर अंत्तमगण (वय ३४, रा. शिरसगाव देशमुख) हे आरोपी प्रणव विठ्ठल देशमुख व सुरज निंबेकर यांचे मित्र आहेत. ९ मे रोजी रात्री प्रणव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला फिर्यादी उपस्थित होते. पार्टीदरम्यान दारू पिण्याच्या कारणावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत धमकावले. यावेळी सुरज निंबेकर याने राहुल अंत्तमगण यांना पकडून ठेवले, तर प्रणव देशमुख याने हातातील बियरच्या काचेच्या बाटलीने फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर वार करून दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी आरोपी प्रणव देशमुख व सुरज निंबेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.