मलकापूर बस स्थानक परिसरात विद्युत पोलवर भीषण शॉर्टसर्किट मोठा आवाज होताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी

मलकापूर:- शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या शुभम पान मंदिर समोरील विद्युत पोलवर काल रात्री सुमारे ११ वाजेच्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या बाबत सविस्तर वृत्त असे की बस स्थानकासमोरील शुभम पान मंदिराजवळ असलेल्या विद्युत पोलवर सुरुवातीला किरकोळ शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर काही क्षणातच ठिणग्यांसह पोलवर कमी प्रमाणात आग लागली. पाहता पाहता शॉर्टसर्किटची तीव्रता वाढत गेली आणि मोठ्या आवाजासह वायरमधून ठिणग्या उडू लागल्या.
शॉर्टसर्किटचा आवाज मोठ्या प्रमाणात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काही काळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती पत्रकार दीपक इटनारे यांनी तत्काळ संबंधित विद्युत विभागाला दिली. माहिती मिळाल्यानंतर विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात आली. बस स्थानक परिसर हा नेहमीच वर्दळीचा भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील जुन्या व धोकादायक विद्युत पोल तसेच वायरिंगची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!