मलकापूर :- तालुक्यातील देवधाबा येथील रेखा गजानन सनानसे (वय ३५) यांचा मोटारसायकलवरून पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा सनानसे या त्यांच्या पती गजानन वामन सनानसे यांच्यासोबत खामखेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास मोटारसायकलने देवधाब्याकडे परतत होत्या. खामखेड रेल्वे स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आल्यानंतर त्या मागील सीटवरून घसरून खाली पडल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नोंद घेतली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती फेंगडे यांच्या सूचनेनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.
मृत रेखा सनानसे यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे.