Headlines

कुऱ्हाडीच्या हल्ल्यात वृद्ध मजूर गंभीर जखमी, बकऱ्यांसाठी पाला आणताना जीवघेणा हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे बकऱ्यांसाठी पाला आणण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय वृद्ध मजुरावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला व पाठीवर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरबा रामराव सरोदे (वय ६०, रा. सिनगाव जहागीर) हे २ जुलै रोजी सकाळी बकऱ्यांसाठी पाला आणण्यासाठी गेले होते. जितमल पठाण यांच्या शेताजवळ पोहोचताच आरोपी पांडुरंग धारे हा हातात कुऱ्हाड घेऊन तेथे आला. त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता सरोदे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात सरोदे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस, कपाळावर तसेच पाठीवर गंभीर वार झाल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. त्यांना प्रथम स्थानिक स्तरावर उपचारासाठी हलविण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अहवाल व जखमींच्या जबाबाच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(२) अंतर्गत आरोपी पांडुरंग धारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!