देऊळगाव राजा : भूखंडाचा हप्ता भरण्यासाठी बँकेतून काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख ८० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेएक ते एक वाजेच्या सुमारास चिखली रस्त्यावरील राष्ट्रसंत प्लाझासमोर घडली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण साहेबराव शेळके (वय ३३, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी भूखंडाचा हप्ता भरण्यासाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १ लाख ८० हजार रुपये काढले होते. ही रक्कम केसरी रंगाच्या थैलीत ठेवून त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली.
त्यानंतर राष्ट्रसंत प्लाझासमोर दुचाकी उभी करून शेळके आधारची माहिती अद्ययावत करण्यासाठी जवळच्या दुकानात गेले. काही वेळाने परत आल्यानंतर दुचाकीची डिक्की उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डिक्कीत ठेवलेली रोकड असलेली थैली गायब होती. या थैलीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँकेची पासबुकही होती.
शेळके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोमवारी रात्री दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक गिरी आणि पोलिस उपनिरीक्षक मांटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.