रेल्वे रुळावर आलेल्या गायीला वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने जोरदार दिली धडक; धडकेत गाय हवेत उडून बाजूलाच खेळत असलेल्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली; चुमुकल्याचा मृत्यू
रेल्वे रुळावर आलेल्या गायीला वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने जोरदार दिली धडक; धडकेत गाय हवेत उडून बाजूलाच खेळत असलेल्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली; चुमुकल्याचा मृत्यू
खामगाव : वाडी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत रेल्वेगाडीच्या धडकेत उडालेली गाय थेट ११ वर्षीय बालकाच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गायीचाही मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडी येथील जय माता दी नगर परिसरातील रहिवासी शंकर वावटूळकर यांचा मुलगा युवराज (वय ११) हा रेल्वे लाईनलगत खेळत होता. त्याच वेळी रेल्वे रुळावर आलेल्या गायीला वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत गाय हवेत उडून थेट बाजूलाच खेळत असलेल्या युवराजच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात युवराजचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी तातडीने युवराजला स्थानिक सामान्य रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती सामान्य रुग्णालयातील कक्षसेवक उमेश पवार यांनी पोलिसांना दिली. डॉक्टरांच्या मेमोवरून खामगाव शहर पोलिस ठाण्यात कलम १९४ बीएनएस अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मधुकर पवार करीत आहेत.