मलकापूर :- बालवयात शिक्षण, स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्यासाठी झगडण्याचे दिवस असताना एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित संकट कोसळल्याची धक्कादायक घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. गर्भधारणा झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, बेलाड येथील एका युवकाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलाड येथील आरोपी युवक आणि संबंधित अल्पवयीन मुलगी यांच्यात काही महिन्यांपासून ओळख होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचा आरोप असून, त्यातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मुलीची प्रकृती बिघडत असल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने कुटुंबीयांसह परिसरातही एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर संबंधित मुलीच्या जबाबाच्या आधारे मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विशाल श्याम इंगळे (वय २६, रा. बेलाड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करीत असून, वैद्यकीय अहवाल, जबाबआणि अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.