समृद्धी महामार्गावर शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या; परिसरात हळहळ

दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने समृद्धी महामार्गावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ जुलै रोजी सकाळी घडली. जगन्नाथ मधुकर शिंदे (४०) यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जगन्नाथ शिंदे हे झोटिंगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे ते जवळपास आठ वर्षे संचालक होते. मलकापूर पांगरा येथे त्यांचे कृषी सेवा केंद्र व भुसार मालाचे दुकानही होते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ३१ जुलै रोजी सकाळी शिंदे हे घरातून निघून कृषी सेवा केंद्रावर गेले. दुकान उघडल्यानंतर तेथून विषारी औषध घेऊन चारचाकी वाहनाने समृद्धी महामार्गावरील तढेगाव फाट्याकडे गेले. दरम्यान, सकाळी सुमारास नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी त्यांचा मुलगा आला असता शिंदे तेथे दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध सुरू करण्यात आला. शोध घेत असताना तढेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर त्यांचे चारचाकी वाहन आढळून आले. यावेळी त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद किनगाव राजा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!